कशामुळे "नो पॉलिटिक्‍स?'

राजकारण, समाजकारण हे समाजाचे अविभाज्य घटक आहेत, हे तरुण वर्ग विसरला आहे. कॉलेज कॅम्पसपासून ते आयटी कंपनीतील तरुण राजकारणाच्या विषयालाच बगल देत आहे.



सर्वाधिक तरुण लोकसंख्या असणारा देश म्हणून आपल्या देशाची ओळख होऊ लागली आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून आतापर्यंत इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात देशातील तरुणांनी झोकून देऊन योगदान दिले आहे. स्वातंत्र्य चळवळीत अनेक तरुणांनी प्राणाचे बलिदान दिले, तर कित्येकांनी तुरुंगवास भोगला. त्यानंतरच्या नेहरू-शास्त्रीजी यांच्या काळातही तरुण राजकारणात सक्रिय होते. जयप्रकाश नारायणांच्या चळवळींना खऱ्या अर्थाने व्यापक स्वरूप देण्याचे काम तरुणांनीच केले.
आज सत्तेवर दिसणारी बहुतेक नेतेमंडळी याच चळवळीतून तयार झाली आहेत. काळ बदलला; जागतिकीकरणाच्या शिरकाव झाला आणि देशातील तरुण अधिक "करिअर ओरिएंटेड' झाला. त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या, त्यांच्या समोरील संधी वाढल्या. ही झाली चांगली बाब. यातून या तरुणाबरोबरच देशाचाही विकास होत गेला.
...
स्थळ ः एके छोटी सॉफ्टवेअर कंपनी
वेळ ः गुरुवारची दुपार... "लोडशेडिंग'मुळे वीज जाऊन बराच वेळ झालेला. या काळात कंपनीचा बॅकअपही संपला. त्यामुळे टाइमपास म्हणून कंपनीतील सगळी टाळकी एकत्र आलेली आणि मग सुरू झाला गप्पांचा फड. बराच वेळ या गप्पा सुरू होत्या. यात राखीच्या स्वयंवरापासून "पती, पत्नी और वोह'पर्यंत सर्व विषय झाले. शाहीद कपूर आणि प्रियांका चोप्रा यांच्या वाढत्या मैत्रीवरही ग्लॅमरस संवाद झाला. धोनीच्या नेतृत्वाखालील "टीम इंडिया'ला बदलले पाहिजे, यावर सर्वांचेच एकमत झाले. झाले ऑफीस संपायला बराच वेळ बाकी होता. इतक्‍यात एकाने सध्या रंगात आलेल्या निवडणुकीचा विषय काढला. त्यामुळे एकसाथ सर्वांचे चेहरे वाकडे. काही जणांनी खुर्च्या मागे वळवल्या, तर काही जण चहा पिण्याचे कारण सांगून सटकले. आता विषय पुढे नेण्याची जबाबदारी उरलेल्या निम्म्या जणांवर होती.
तेवढ्यात त्यांच्यातील एक जण उत्साहात ओरडला, ""जो कोणी मतदान करतो, त्यालाच या विषयावर बोलण्याचा हक्क आहे.'' अर्थातच सर्व जण शांत राहिले. या विषयाला कसा हुशारीने बगल दिली, असा आविर्भाव त्या तरुणाच्या चेहऱ्यावर दिसू लागला होता.
....
स्थळ ः पुणे विद्यापीठाची चावडी अर्थात जयकर लायब्ररीसमोरचा परिसर.
वेळ ः दुपारची डबे येण्याआधीची... म्हणजे सर्व प्रकारच्या गप्पांना अनुकूल. विद्यापीठाच्या "रिफेक्‍टरी'तील जेवणापासून बराक ओबामाच्या डिनर पार्टीपर्यंत कोणत्याही विषयावर इत्थंभूतपणे चर्चा होण्याचे हे ठिकाण. मात्र, या ठिकाणी निवडणुकांचा विषय वर्ज्य आहे, असे वातावरण सध्या आहे. राज्याच्या सर्व भागांतून इथं विद्यार्थी आले आहेत. त्यामुळे पूर्ण राज्याच्या चित्राचा अंदाज यायला हरकत नाही. मात्र, ही आशा फोल ठरते. येथे आजही चर्चा रंगत आहे, दिवाळीनंतरच्या "एसटीआय'ची आणि आगामी "नेट-सेट'ची..
....
स्थळ ः फर्ग्युसन कॉलेज रोड.
वेळ ः संध्याकाळी सातनंतरची.
एक ग्रुप मस्त संध्याकाळ एन्जॉय करत या रस्त्यावरून फिरत होता. हा ग्रुप तुलनेने राजकारणात अधिक रस घेणारा वाटला. त्यांच्यात चर्चा सुरू होती... वृत्तवाहिन्यांवर सुरू असणाऱ्या नेत्यांमधील शाब्दिक द्वंद्वाची. त्यांची चर्चा या द्वंद्वापुरतीच मर्यादित होती. यातील बहुतेक जण राज्याच्या इतर शहरांतून आलेले. त्यामुळे ते मतदानासाठी गावाकडे जातील की नाही, माहिती नाही.
...
प्रगतीच्या प्रत्येक क्षेत्रात तरुणांनी दिलेल्या योगदानामुळेच आपण महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहोत. एकूण देशाच्या जडणघडणीचा महत्त्वाचा अंग असणाऱ्या राजकारणाकडे मात्र या तरुणांकडून काहीशा तुच्छतेने पाहिले जात आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येकाला कुठल्यातरी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेण्याची गरज नाही. उमेदवार आणि पक्षांची पारख करत किमान मतदानात सहभाग नोंदविण्याची गरज आहे. त्यामुळे लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत सर्वांनी सहभाग नोंदविण्याची गरज आहे.
---

मधुबन पिंगळे
mmpingle@gmail.com

Comments

Popular posts from this blog

Limited Options for Iran

Russian Oil Benefits India